प्रति जोडपे 50 हजार इतके अर्थसहाय्य
वर्धा, : अस्पृशता निवारण्याकरीता आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतआर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंर्गत जिल्ह्यास सन 2024-25 या आर्थिक सत्राकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास 1 कोटी 45 लाख रुपयाची तरतूद प्राप्त झालेली होती. प्राप्त तरतूदीनुसार सन 2022- ते 13 सप्टेंबर 2024-25 या कालावधीत प्रस्ताव सादर केलेल्या जिल्ह्यातील एकुण 290 लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले आहे.
आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहन देण्याच्या या योजनेंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शिख या धर्मातील असल्यास अशा आंतरजातीय विवाहितास या योजनेंतर्गत प्रति जोडपे 50 हजार रुपयाचे इतके अर्थसहाय्य देण्यात येते. सदर रक्कम जोडप्याच्या संयुक्त बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी वर आणि वधू दोघांचेही जातीचे प्रमाणपत्र, डोमेसाईल, शाळा सोडल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, आधारकार्ड व संयुक्त बँक खात्याचे पासबुक असणे आवश्यक आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.






